वांद्रे येथे स्पॅनिश तरुणीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह याला अटक केली आहे. पीडित तरुणीनेही या आरोपीला ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास वांद्रे येथील पेरी रोडवरील पेरीडॉट इमारतीतील स्पॅनिश तरुणीच्या घरात हा आरोपी घुसला होता. चोरीच्या उद्देशाने त्याने घरात खिडकीतून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी ही तरुणी एकटी असल्याचा फायदा उचलत त्याने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता. मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पीडित तरुणीनेही त्याला ओळखले असून त्यानेही आपल्या कृत्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बादशाहला २९ ऑक्टोबर रोजी अभिनेता दिनू मोरीया याच्या घरात झालेल्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून त्यावेळी १७ लाखांचा चोरलेला ऐवजदेखील जप्त करण्यात आला होता. परंतु तो लगेचच जामीनावर सुटला होता. बादशाह याच्यावर भायखळा, वांद्रे आणि खार पोलीस ठाण्यात तब्बल २२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलीस अधिकारी उघडपणे बोलायला तयार नव्हते. स्पॅनिश तरुणीच्या बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह (३०) याला रे रोड येथून अटक करण्यात आली. त्याच्या नावावर एकूण ३५ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी त्याने आणखीही दोन घरात चोरी केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी पुर्वीच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर सोमवारची घटना घडली नसती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा