मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) मॅकगिल लायब्ररी अँड कलेक्शन्स, मॅकगिल युनिव्हर्सिटी (कॅनडा) यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २२ डिसेंबर या कालावधीत सकाळी १०.३० ते ५.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई येथे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये नैसर्गिक इतिहास, वन्यजीव आणि पर्यावरणावरील दुर्मिळ आणि पुरातन पुस्तकांचा उल्लेखनीय संग्रह मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
प्रदर्शनात शतकानुशतकांच्या वैज्ञानिक शोधांवरील दुर्मिळ हस्तलिखिते, सचित्र पुस्तके, वैज्ञानिक जर्नल्स आणि फील्ड गाईड्स पाहण्याची संधी मिळणार आहे. यापैकी काही साहित्य १७ व्या आणि १८ व्या शतकातील असून, ते नैसर्गिक जगाचा शोध, अभ्यास आणि संवर्धन यांचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करतात. दरम्यान, हे प्रदर्शन तीन विभागांत मांडण्यात येणार आहे. रसेल, पॅट्रिक (१८०१), जॉन गोल्ड (१८५०-१८७३), वॉलिच, नॅथॅनियल (१८३२) यांसारख्या प्रख्यात निसर्गशास्त्रज्ञांच्या दुर्मिळ पहिल्या आवृत्तींचा समावेश आहे. दुसऱ्या विभागात हाताने रेखाटलेले जॉन गोल्डचे द बर्ड्स ऑफ जेम्स फोर्ब्सचे ओरिएंटल मेमोयर्स (१८१३) आणि नाकाशे ही ठळक वैशिष्ट्ये असणार आहेत. तसेच तिसऱ्या विभागात वनस्पती, जीवजंतू आणि भूगर्भीय रचना दर्शविणारी आणि नैसर्गिक इतिहासाची कला आणि विज्ञानाचा उलगडा करणारी चित्रे बघायला मिळतील.
हेही वाचा >>> आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक
निसर्गप्रेमींनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन बीएनएचएसच्या ग्रंथपाल निर्मला बरुरे यांनी केले आहे. दरम्यान, १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत दररोज १०.३० ते सायंकाळी ५.३०, तर २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत प्रदर्शन पाहता येईल.