मुंबई : १३ महिन्यांच्या बाळाला ॲलजील सिंड्रोम हा यकृताच्या अनुवांशिक आजाराचे निदान झाले. त्यामुळे मुंबईमधील डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण व दुर्मिळ शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले.

तीन महिन्यांपूर्वी बाळाला काविळ झाल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी केलेल्या विविध तपासण्यांमधून बाळाच्या यकृताचे काम योग्य प्रकारे होत नसल्याने आढळले. त्यामुळे अधिक तपासण्या केल्या असता बाळाला ॲलजील सिंड्रोमचे निदान झाले. जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांत बाळाला ॲलजील सिंड्रोम झाल्याचे कळल्याने त्याच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्याची तब्येत दिवसेंदिवस अधिकच ढासळत गेली. आजार हळूहळू वाढत असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

बाळाच्या यकृत प्रत्यारोपणासाठी जिवंत दात्याचा शोध घेण्याचे ठरले. मात्र त्याच्या आईनेच त्याला यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. बाळाचे वजन केवळ ५.५ किलोग्रॅम असल्याने आणि शरीराच्या पृष्ठभागाचा आकार लहान असल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. शस्त्रक्रियेदरम्यान सिर्हाटिक नेटिव्ह लिव्हर काढून टाकणे व दात्याकडून मिळालेल्या तुलनेने मोठ्या आकाराच्या यकृताचे रोपण करणे अत्यंत आव्हानात्मक होते. डॉक्टरांनी तब्बल १२ तास यशस्वी शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेनंतर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. पहिल्या तीन दिवसांसाठी त्याला यांत्रिक श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. त्यानंतर आणखी दोन दिवस त्याला अतिदक्षता विभागामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत अधिक सुधारणा होईपर्यंत त्याला एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले.

बाळाला त्याच्या आईकडून मिळालेले यकृताचा ग्राफ आणि बाळाच्या उदराची पोकळी यांचा आकार जुळणारा नव्हता. अशा प्रसंगी रक्तवाहिन्यांच्या रचनेला धक्का लागू नये याची खबरदारी घेत अत्यंत काटेकोरपणे यकृताच्या ग्राफ्टचा आकार कमी करावा लागला. अचूकतेसाठी हाय-मॅग्निफिकेशन लेन्सेसचा वापर करून व्हॅस्क्युलर ॲनास्तोमोसिसची अत्यंत नाजूक प्रक्रिया पार पाडावी लागली. यासाठी तब्बल १२ तास शस्त्रक्रिया करावी लागल्याचे नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स रुग्णालातील लिव्हर ट्रान्स्प्लान्ट अँड एचपीबी सर्जरी विभागाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

अत्यंत कमी वजनाच्या बाळाच्या शरीरात एका जिवंत दात्याच्या यकृताचे प्रत्यारोपण करणे ही एक अत्यंत जोखमीची व तांत्रिकदृष्ट्या मोठ्या कुशलतेने करण्याची प्रक्रिया आहे. जगभरामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच डाॅक्टरांकडे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळण्याचे कौशल्य असल्याचे डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.