पुस्तकांच्या हजारो प्रतींच्या आवृत्ती काढण्याचा पायंडा मागे पडून आता जगभर वाचकांच्या ‘मागणीनुसार छपाई’ अर्थात ‘प्रिंट ऑन डिमांड’ या तंत्राने पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. परंतु, याही पुढे जाऊन ‘प्रिंट ऑन डिमांड’ संकल्पना वापरत दुर्मिळ किंवा ‘आउट ऑफ स्टॉक’ मराठी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘पुस्तकसागर’ प्रकाशनने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, लवकरच वाचकांना हवी असलेली दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळणार आहेत.
मराठीमध्ये गेल्या पावणेदोनशे वर्षांच्या काळात अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील बहुतांश पुस्तके सध्या दुर्मिळ झाली असून वाचकांना ती वाचण्यासाठी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा पुस्तकांची छपाई पुन्हा करावी यासाठी वाचकांकडून प्रकाशकांकडे सतत मागणी होत असते. मराठीत पुस्तकांची एक आवृत्ती संपण्यासाठी वर्षांनुवर्षे वाट पाहावी लागत असल्याने प्रकाशक या दुर्मिळ पुस्तकांची नवी आवृत्ती काढण्याचा धोका सहसा पत्करत नाहीत. त्यामुळे ‘पुस्तकसागर’ या मुंबईमधील प्रकाशनने अशा दुर्मिळ पुस्तकांना वाचकांच्या मागणीनुसार त्यांच्यापर्यत पोहोचवण्यासाठी ‘मागणीनुसार छपाई’ या प्रकाशन तंत्राचा अवलंब केला आहे. या उपक्रमात वाचकाला हवे असणारे पुस्तक त्यांनी ‘पुस्तकसागर’ला कळवल्यास अगदी आठ दिवसांत ते वाचकांना घरपोच मिळणार आहे. सध्या पुस्तकसागरने ५०-६० नव्या-जुन्या मराठी पुस्तकांच्या छपाईचे काम सुरूही केले आहे. यात ‘भाऊसाहेबांची बखर’, साने गुरुजी यांनी लिहिलेले ‘बापुजींच्या गोड गोष्टी’चे सात भाग, चिपळूणकरांची ‘निबंधमाला’, नारायण बांदेकर यांचे ‘टिळक गेले त्या वेळची गोष्ट’ आदी पुस्तकांचा समावेश आहे. तसेच येत्या काळात सुमारे पाच हजार नवी-जुनी पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देणार असून या आंतरराष्ट्रीय दर्जाची छपाई व बांधणी असणाऱ्या या पुस्तकांच्या किमती ऑफसेट पुस्तकांच्या किमतींइतक्याच राहणार असल्याचे ‘पुस्तकसागर’चे पराग पाटील यांनी सांगितले. वाचकांनीही त्यांच्याकडे असणारी दुर्मिळ पुस्तके पुस्तक सागरकडे दिल्यास ती इतर वाचकांपर्यंतही पोहोचवता येतील तसेच येत्या काळात मराठीबरोबरच गुजराती, कन्नड आदी भारतीय भाषांतील पुस्तकेही छापणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

खर्चही कमी
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर म्हणजे १ मेपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात दुर्मिळ व सध्या बाजारात उपलब्ध नसलेली पुस्तके डिजिटल तंत्राने प्रकाशित करून वाचकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एरवी पुस्तके ऑफसेट तंत्राने छापली जातात. त्यात मोजक्या प्रतींच्या प्रकाशनासाठी तुलनेने अधिक खर्च होतो. त्यामुळे शंभरपेक्षा कमी प्रतींची आवृत्ती काढायची असल्यास खर्च वाढतो. परंतु, आता नव्या डिजिटल तंत्रामुळे छपाई खर्च कमी झाल्याने वाचकांच्या मागणीनुसार पुस्तकाची एकच प्रत काढणेही सहज शक्य झाले आहे.

Story img Loader