मुंबई: प्रशासनाचे प्रमुख मुख्य सचिव मनोज सौनिक आणि पोलीस दलाचे प्रमुख महासंचालक रजनीश शेठ हे महिनाअखेर निवृत्त होणार असल्याने या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर कोणाची नियुक्ती होते याची प्रशासन आणि पोलीस दलात उत्सुकता आहे. मुख्य सचिव सौनिक यांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक की मुंबईच्या पोलीस आयुक्त यापैकी कोणत्या पदावर वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य सचिव मनोज सौनिक येत्या ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. सौनिक यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार मुख्य सचिवपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौनिक यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे.

हेही वाचा >>> बाह्य सुरक्षेपेक्षा अंतर्गत सुरक्षेचे आव्हान मोठे – मनोज एम. नरवणे

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता विद्यमान मुख्य सचिवांना कायम ठेवण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख दिनकर गुप्ता यांचाही कार्यकाल संपत असून या तिघांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधिन असून पंतप्रधान उद्या त्याबाबत निर्णय घेण्याची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसेवा आयोगाकडून नावाची प्रतीक्षा

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. राज्याच्या महासंचालक पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला, संदीप बिष्णोई, विवेक फणसळकर, प्रज्ञा सरवदे, जयजित सिंह आणि सदानंद दाते यांचे प्रस्ताव सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविले आहेत. नियमानुसार राज्याच्या महासंचालकपदासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक सेवाकाळ शिल्लक असणारा अधिकारी पात्र ठरतो. यातील बिष्णोई आणि सिंह एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होत असून शुक्ला जूनमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर यांची महासंचालकपदी आणि त्यांच्या जागी शुल्का यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबात उद्या लोकसे्वा आयोगाची बैठक होणार असून त्यात राज्यातील ज्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यातून दोन अधिकाऱ्यांची महासंचालक पदासाठी शिफारस लोकसेवा आयोग करणार असून त्यातून एकाची मुख्यमंत्री निवड करतील. मात्र या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कायर्म्भार सोपवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi shukla likely to considered for the post of dgp or mumbai police commissioner zws