राज्यात आतापर्यंत झालेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये अनेक युवतींनी छेडछाडविषयी मुद्दे उपस्थित केले असून या संदर्भात राज्य शासनानेही ठोस पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात “छेडछाडमुक्त महाविद्यालय” असा सेल स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून येत्या वर्षभरात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ठाणे येथे दिली.
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवती मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शहरातील राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या महाविद्यालयातील युवती या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. या युवतींशी सुप्रिया सुळे यांनी प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या मेळाव्याविषयी तसेच राज्य शासनाने “छेडछाडमुक्त महाविद्यालय” सेल स्थापन करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात “छेडछाडमुक्त महाविद्यालय” सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या सेलकडे तक्रारी केल्यानंतर महाविद्यालय संबंधितांवर कारवाई करणार आहे. त्यामुळे छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार आणि स्त्री-भ्रूण हत्या संदर्भातील प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून पुन्हा तीच घटना करताना कोणाचीही हिम्मत होणार नाही आणि असे प्रकार थांबतील, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader