Ratan Tata Pet Dog: उद्योगपती रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. रतन टाटा यांचं श्वानप्रेम जगजाहीर आहे. टाटांच्या मृत्यूनंतरही याचा प्रत्यय आला. रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा पाळीव श्वान ‘गोवा’ यालाही आणलं होतं. ‘गोवा’ रतन टाटा यांच्या शवपेटीजवळ बसल्याचं चित्र पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. आता याच गोवाबद्दल एक अफवा सोशल मीडियावर उडाली आहे. रतन टाटा यांचा विरह सहन न झाल्यामुळे गोवा हाही मरण पावला, असा एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्याबरोबर रतन टाटा आणि गोवा याचेही फोटोही व्हायरल होत होते. यानंतर मुंबई पोलिसांनी व्हायरल मेसेजची दखल घेतली आहे.

काय म्हटलं मुंबई पोलिसांनी?

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची खरी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर गोवा या पाळीव श्वानाबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. “वाईट बातमी… टाटांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पाळीव श्वान गोवा याचाही तीन दिवसांनी मृत्यू झाला आहे. म्हणूनच म्हटलं जातं की, श्वान आपल्या मालकांप्रती माणसांपेक्षाही अधिक निष्ठा वाहतो”, असे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं गेलं होतं.

हे वाचा >> मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video

गोवा श्वानाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानंतर सुधीर कुडाळकर यांनी स्वतःहून त्याची खातरजमा केली. तसेच टाटा यांचा तरूण मित्र शंतनू नायडूकडूनही त्यांनी सत्य जाणून घेतलं. या माहितीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करत म्हटलं की, गोवा अगदी सुखरूप आहे. त्याला काहीही झालं नाही. तसेच शंतनूनेही म्हटलं की, गोवा अतिशय व्यवस्थित आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही.

सुधीर कुडाळकर यांनी इन्स्टग्रामवर ही माहिती दिली. ज्यात म्हणाले की, रतन टाटा यांच्या जवळचे सहकारी शंतनू नायडू यांच्याकडून माहिती घेतली असून गोवा सुखरुप असल्याचे त्याच्याकडून समजले. त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय अशा पोस्ट कुणीही व्हायरल करू नयेत.

हे ही वाचा >> Ratan Tata: “माफ करा, माझा कुत्रा आजारी आहे”, रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्सकडून मिळणारा पुरस्कारही नाकारला होता!

मुक्या प्राण्यांवर रतन टाटांचं फार प्रेम होतं. त्यातही श्वानांवर त्यांचा विशेष जीव होता. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सातत्याने श्वानासाठी लोकांना आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. याच वर्षाच्या सुरुवातीला रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत टाटा ट्रस्टचं ‘स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल’ देखील सुरू झालं होतं.

गोवा हा श्वान रस्त्यावर सापडला होता. ११ वर्षांपूर्वी टाटाचा एक कर्मचारी कामासाठी गोव्याला गेला होता आणि त्याला रस्त्यात एक कुत्रा दिसला, तो त्याला मुंबईला घेऊन आला. तो गोव्यात सापडल्याने टाटांनी त्याचे नाव गोवा ठेवले. हा श्वान बॉम्बे हाऊसमध्ये राहतो.