राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा शुक्रवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आरएसएसशी संलग्न असलेल्या नाना पालकर स्मृती समितीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रतन टाटा सहभागी झाले होते. महत्वाचं म्हणजे आजच लंडनमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचा आत्माच बदलायचा आहे. अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर ताबा मिळवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही असे ते म्हणाले. एवढयावरच राहुल गांधी थांबले नाहीत तर त्यांनी अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली.

नेमके आजच्याच दिवशी रतन टाटा संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. धर्म हा समाजाचा विसर पडू न देणारा व्यवहार आहे. सगळ्या जगाकडे बंधुभावाने पाहणे, त्यांच्या साठी झटणे महत्वाचे आहे. आपण जे करतोय ते समाजाला पुढे नेण्यासाठी करतोय हा भाव त्यामागे असला पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

समाजकार्याची केवळ चर्चा केली जाते. पण या कार्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणाऱ्यांसाठी नाना पालकर हे आजही प्रेरणादायी आहेत. आज आपल्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. पण जेव्हा ही साधने नव्हती तेव्हा त्यांनी कशाचीही वाट न पाहता, आपल्याला हे कार्य जमेल की नाही, अशा प्रश्नात न अडकता समाजातील एका घटकाला आपली गरज आहे या जाणीवेने ते कार्य करत राहिले. प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार समाजकार्यात सहभागी होऊ शकतो असे ते म्हणाले.

याआधी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी सुद्धा बराच गहजब झाला होता. काँग्रेसने मुखर्जींवर टीकाही केली होती. त्यावेळी प्रणव मुखर्जींनी आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांची स्तुती करताना ते भारतमातेचे थोर सुपूत्र असल्याचे म्हटले होते.