जमिनींच्या किमतीबाबत राज्य शासनाच्या ‘रेडी रेकनर’च्या दरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील घरांच्या किमती आकाशाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील बोरिवली तालुक्यात तर ठाण्यातील घोडबंदर परिसरातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने मंगळवारपासून नवीन रेडी रेकनर दर लागू केले आहेत. ज्या भागात घरांचे दर अगोदरच जास्त आहेत, तसेच ज्या भागात घरांची संख्या वाढत आहे, त्या भागातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील बोरिवली तालुक्यातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. रघुलीला मॉल परिसरातील रेडी रेकनरचा दर सहा हजारावरून २१ हजारावर गेला आहे. म्हणजेच ही वाढ जवळपास तिप्पट आहे. अशाच प्रकारे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांमधील रेडी रेकनरचे भाव वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात घर घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बांधकाम होत आहे, त्या ठिकाणच्या रेडी रेकनरचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. वरळी, दादर, महालक्ष्मी, अंधेरी या भागांत मोठय़ा प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणच्या दरांवर रेडी रेकनरच्या दराचा मोठय़ा प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येतो.
रेडी रेकनरच्या दरांवर विकासकांच्या घरांच्या किमती ठरतात. सरकारच्या अधिकृत दरांतच २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत भर पडणार असली तरी सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न मात्र हवेतच विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेडी रेकनरच्या दरानुसार बांधकाम व्यावसायिकांनीही वाढ सुरू केल्याने घरांच्या किमती आणखी वाढतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा