मुंबई : कोकण रेल्वेवरील स्थानके आणि या मार्गाची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होईल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. तसेच चोरीच्या घटना, दरोडे, विनयभंग अशा घटनांच्या तक्रारी तत्काळ करता येतील. या ठाण्यात सुमारे १४० पोलिसांचा ताफा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)कडे आहे. तर, उपनगरीय मार्ग, रेल्वे स्थानके, रेल्वे परिसर आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. मुंबई महानगरातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानके मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत येतात. मात्र, रोह्यानंतर कोकण रेल्वेची हद्द सुरू होत असल्याने, या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस ठाण्याची आहे. कोकण रेल्वे मार्गावर एखादा गुन्हा घडल्यास संबंधित प्रवासी तक्रार देण्यास लोहमार्ग पोलिसांकडे जातात. परंतु, रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. तसेच कोकण रेल्वे प्रवासात महिला संबंधित गुन्हे घडत असल्याने तत्काळ गुन्हा नोंद करून, तपास करणे आवश्यक असते. मात्र, कोकण रेल्वे हद्दीत लोहमार्ग पोलीस नसल्याने, रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी लागत होती. त्यामुळे आता रत्नागिरी रेल्वे स्थानकांवर लोहमार्ग पोलीस ठाणे उभारल्याने, प्रवाशांना तक्रार करणे सोयीचे होणार आहे.

हेही वाचा…सागरी किनारा मार्गावरील भरधाव गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणार

कोकण रेल्वे मार्गावरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडे दिली आहे. याबाबत शासनाकडून मान्यता मिळाली असून २६ जानेवारी रोजी रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित केले जाईल. या पोलीस ठाण्याची हद्द ही रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानक ते विन्हेरे रेल्वे स्थानक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी रेल्वे स्थानक ते राजापूर रेल्वे स्थानकापर्यंत आहे. साधारण १४० रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा तेथे कार्यरत राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ लोहमार्ग पोलिसांने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri lohmarg police station begin operations at ratnagiri railway station on republic day boosting passenger safety mumbai print news sud 02