चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार, बालरंगभूमी तसेच प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रासाठी देण्यात येणार असून एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डिसेंबर-२०१४ मध्ये होणाऱ्या चतुरंग रंगसंमेलनात हा पुरस्कार मतकरी यांना प्रदान केला जाणार आहे.
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील निशिकांत जोशी, दीपक घैसास, सुधीर जोगळेकर, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, मंगला गोडबोले यांच्या निवड समितीने ही निवड एकमताने केली. मतकरी यांनीही पुरस्कार स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.
मतकरी यांनी सातत्याने गेली अनेक वर्षे आपल्या अव्वल नाटय़गुणांच्या बुद्धीमंत प्रतिभेने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर मूलतत्वशील स्वरुपाची मौल्यवान भर घातली आहे. सर्वसामान्य नाटय़रसिकांच्या मनात वसत असलेली कृतज्ञता या पुरस्काराने व्यक्त होत असल्याची भावना चतुरंग प्रतिष्ठान आणि पुरस्कार निवड समितीने व्यक्त केली आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून नाटक नावाच्या गोष्टीचा विकास आणि अखंडित अभ्यास दर्शविणाऱ्या प्रयोगशीलतेची दखल घेत निवड समितीने मतकरी यांचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कारासाठी विशेषत्वाने विचार केला आहे.
प्रतिष्ठानकडून यापूर्वी सांस्कृतिक क्षेत्रासाठी भालजी पेंढारकर (चित्रपट), पु. ल. देशपांडे (बहुविविधता), पं. सत्यदेव दुबे (नाटक), सुधीर फडके (संगीत), बाबासाहेब पुरंदरे (इतिहास), डॉ. अशोक रानडे (संगीत), श्री. पु. भागवत (साहित्य संपादन), आचार्य पार्वतीकुमार (नृत्य), भालचंद्र पेंढारकर (संगीत नाटक), लता मंगेशकर (गायन) आणि विजया मेहता (ज्येष्ठ रंगकर्मी) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रत्नाकर मतकरी यांना चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार, बालरंगभूमी तसेच प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची निवड करण्यात आली आहे.
First published on: 25-08-2014 at 03:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnakar matkari gets life achievement award