लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव वाढला असून उंदरांचा सुळसुळाट असल्याने शस्त्रक्रियागृहामध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग व नेत्र विभागासाठी असलेल्या शस्त्रक्रियागृहामध्ये मागील काही दिवसांपासून उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शस्त्रक्रियागृहामध्ये संसर्ग पसरून रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. मात्र ही बाब लक्षात घेत शस्त्रक्रियागृहामध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार करून शस्त्रक्रियागृहातील उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह हा अतिशय संवेदनशील विभाग असतो. शस्त्रक्रिया विभाग हा साफ, स्वच्छ तसेच निर्जंतूक ठेवणे आवश्यक असते. तरीही शस्त्रक्रियागृहामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
आणखी वाचा-मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
जोगेश्वरीतील बाळासाहेब ट्रॉमा केअर सेंटरमध्ये २०१९ मध्ये सात रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यापैकी पाच रुग्णांना संसर्ग होऊन त्यांना कायमचे अंधत्व आले होते. शस्त्रक्रियागृह दररोज स्वच्छ करणे अपेक्षित असताना या रुग्णालयात दोन आठवड्यातून एकदा स्वच्छ करण्यात येत होते. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे पाच जणांच्या आयुष्यात कायमचे अंधत्व आले होते. व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या शस्त्रविद्या व नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहातील उंदरांच्या प्रादुर्भावामुळे याची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात व्ही.एन. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरभजन सिंग बावा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा स्वरुपाची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले. असा काही प्रकार घडत असेल तर त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.