Ravi Raja मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा ( Ravi Raja ) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे त्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहोत असं रवी राजा यांनी म्हटलं आहे. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राजा ( Ravi Raja ) यांनी काँग्रेसला हात दाखवत कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्याबरोबरच बाबू दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते भाजपात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
दिवाळीच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी भाजपात प्रवेश केला आहे मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. बाबू दरेकर हे उबाठा सेनेचे आहेत.भाजपात त्यांनी प्रवेश केल्याने आमची घाटकोपरची ताकदही वाढणार आहे. त्यामुळे मी दरेकर यांचंही स्वागत करतो. आता ५ किंवा ६ नोव्हेंबरपासून प्रचार सुरु झालेला असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महायुतीचं सरकार येणार आहे
भाजपात येत्या काही दिवसात मोठे पक्षप्रवेश होतील. काँग्रेसचे ते नेते कोण हे मला विचारु नका. महायुतीचं सरकार हे सत्तेत येणार आहे. महायुती संदर्भात सकारात्मकता पाहण्यास मिळते आहे. नामांकन पूर्ण झालं आहे. त्यानंतर काही ठिकाणी क्रॉस फॉर्म आले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मी आणि महायुतीचे प्रमुख नेते होते. आमच्यातले सगळे इश्यू आम्ही संपवले आहेत. तुम्हाला त्याचं प्रत्यंतर आज आणि उद्या दिसेल. जे क्रॉस फॉर्म भरले गेले आहेत ते परत घेतले गेलेले दिसतील. काही ठिकाणी बंडखोरी आहे. त्यासंदर्भातली नीतीही तयार आहे. तिन्ही पक्ष मिळून यावरुन मार्ग काढत आहोत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. चांगले लोक भाजपात प्रवेश करत आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे जे म्हणाले ती चांगली गोष्ट आहे. मात्र आज मी तुम्हाला हे सांगतो की महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. महायुतीचं सरकार येईल, भाजपाचं सरकार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही चांगले पक्षप्रवेश येत्या काळात प्रवेश होतील. तुम्ही त्याची वाट पाहा आमज मला विचारु नका असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.