मुंबई : मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मुंबईतील ३० बड्या थकबाकीदारांची यादी व थकीत मालमत्ता कराची माहिती दिली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेही ११ कोटी रुपये मालमत्ता कर थकवल्याचे या यादीत नमुद आहे.
पालिकेच्या मालत्ता कराची थकबाकी सुमारे पाच हजार कोटींच्या पुढे असल्याचा आरोप राजा यांनी आपल्या पत्रात केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकवणाऱ्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारची प्राधिकरणे, पालिकेच्या इमारती व खासगी व्यावसायिक, बांधकाम विकासक यांच्या मालमत्तांचाही समावेश आहे. तसेच भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कररचनेतील तक्रारींमुळे न्यायालयातील खटल्यांमुळे अडकलेली थकबाकीही यात आहे. अशा थकबाकीदारांची हजारो कोटींची थकबाकी अद्याप वसूल झालेली नाही. पालिका प्रशासनाने व्यावसायिक झोपडपट्ट्यांवर कर लावण्याऐवजी या थकबाकीदारांकडून वसूली करावी, अशी मागणी राजा यांनी केली आहे. आपल्या पत्रासोबत राजा यांनी ३० मोठ्या थकबाकीदारांची यादीही जोडली आहे. दरम्यान, मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस पाठवणे, जप्ती, अटकावणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती कर निर्धारण व संकलक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा…कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
एमएसआरडीसीचे ११ कोटी थकीत
राजा यांनी दिलेल्या यादीत एलआयसीची सर्वाधिक अडीचशे कोटी रुपये थकबाकी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर डीबीएस रिएलिटी, कमला मिल आणि एमएसआरडीसी यांनीही मालमत्ता कर थकवल्याचे म्हटले आहे.