नुकतेच जामिनावर तुरुंगातून सुटलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याने माध्यमांशी बोलून न्यायालयाने जामीन देताना ठेवलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केलाय. यावरूनच जामिनाला राज्य सरकार राणा दाम्पत्याच्या जामिनाला आव्हान देणार आहे. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी राणा म्हणाले, “महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. ओबीसींवर खूप मोठा अन्याय होत आहे. न्यायालयांमध्ये महाराष्ट्राचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे अनेक महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात जाऊन ताकद लावत आहेत. मात्र, आम्ही कोर्टाचा कोणताही अवमान केलेला नाही.”

“आम्ही न्यायालयाच्या नियमांचं पालन करत आहोत”

“आम्ही न्यायालयाच्या नियमांचं पालन करत आहोत. संविधानाचा आम्ही आदर करतो. आम्ही न्यायालयीन विषयाचा उल्लेख न करता प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलंय. जी घटना झाली त्याचा आम्ही उल्लेख केलेला नाही. आमच्याविरोधात अनेक यंत्रणा काम करत आहेत. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होतोय, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय,” असा आरोप रवी राणा यांनी केला.

“आमचा आवाज दाबला तर तो दबला जाणार नाही”

“आम्ही सरकारविरोधात मतं व्यक्त केलीत. आम्ही सरकारविरोधात, मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो. शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी बोलताना आमचा आवाज दाबला तर तो दबला जाणार नाही. संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, त्यानुसार आम्ही बोलत राहू,” असंही रवी राणा यांनी नमूद केलं.

“मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र केलं ते माध्यमांमध्ये यायला हवं”

रवी राणा पुढे म्हणाले, “अनेक शिवसेना नेत्यांनी नवनीत राणा नाटक करत असल्याचा आरोप केला. नवनीत राणा आणि मला तुरुंगात टाकलं जातं आणि तरीही शिवसेनेचे नेते नाटक करत आहेत असं बोलत आहेत. मागील तीन दिवस नवनीत राणा यांच्यावर उपचार झालेत. ते जनतेपर्यंत पोहचलं आहे. आमच्यावर जो अन्याय झाला, मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र केलं ते माध्यमांमध्ये यायला हवं.”

हेही वाचा : “उपमुख्यमंत्री म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो; हो, पण पहाटे ५ पर्यंत…”, रवी राणांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

“लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची व्हिडीओ रिलीज करा”

“जर त्यांना नवनीत राणा यांनी नाटक केलं असं वाटत असेल तर त्यांनी शांताकूल लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची व्हिडीओ रिलीज करावी,” अशी मागणी रवी राणा यांनी माध्यमांसमोर केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana comment on thackeray government challenge bail in court pbs