आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. ठाकरे सरकारने एका महिलेसोबत कशाप्रकारे वर्तन केले हे सर्वांनी पाहिलं आहे, असं मत रवी राणा यांनी व्यक्त केलं. तसेच या सरकारच्या मागील २ वर्षाच्या काळात महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ९० टक्के खोटं बियाणं दिल्याचा गंभीर आरोप केला.
रवी राणा म्हणाले “जे झालं ते देशातील सर्व रामभक्त आणि हनुमान भक्त पाहत होते. एका महिलेसोबत कशाप्रकारे वर्तन केलं जात होतं, कशाप्रकारे दबाव आणला जात होता हे सर्वांनी पाहिलं. महाराष्ट्रात एका महिलेला तुरुंगात वाईट वागणूक दिली. त्यांना सहा दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यावर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. त्यांना कोणताही उपचार देण्यात आला नाही. आता नवनीत राणा खूप दुःखी आहेत. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा सीटी स्कॅन झाला, दोन-तीन वेळा रक्तचाचणी झाली.”
“आम्ही तुरुंगात असताना बीएमसीकडून नोटीस”
“मी आणि खासदार नवनीत राणा तुरुंगात असताना मला बीएमसी खारमधील आमच्या घरी वारंवार नोटीस देऊन कारवाई करू पाहत आहे. ही इमारत ज्या बिल्डरने बांधली त्याला १५ वर्षापूर्वी बीएमसीने परवानगी दिली होती. आता १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं. आता द्वेषाची आणि सुडाची कारवाई केली जात आहे. ही राजकीय कारवाई आहे. त्यामुळे त्यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी असंच मी सांगणार आहे. मी हवं ते सहकार्य करेल, पण महाराष्ट्रात काय सुरू आहे हे देशातील जनतेला माहिती आहे,” असं रवी राणा यांनी सांगितलं.
“फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची जनतेचा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता”
रवी राणा पुढे म्हणाले, “आमचा न्यायालयावर विश्वास आहे आणि सन्मान करतो. न्यायालयाने आम्हाला या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही पालन करणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रात जे कृत्य सुरू आहे ते याआधी कधीही महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची जनतेचा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता होती. त्याची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला येत आहे.”
“२ वर्षात महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ९० टक्के खोटं बियाणं, मात्र…”
“महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. मागील २ वर्षात महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ९० टक्के खोटं बियाणं देण्यात आलं. मात्र, तरीही महाबीजवर कोणतीही कारवाई केलेली नाही. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला खतं देण्यात आलेत. ते जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये पुरवले पाहिजे. महाराष्ट्रात नवे उद्योग आले पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन आहे. महाराष्ट्रात औद्योगिक विकास थांबलाय आणि बेरोजगारी वाढली आहे,” असं रवी राणा यांनी सांगितलं.
“आता मुख्यमंत्र्यांनी बाहेर निघून राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात फिरलं पाहिजे. त्यांनी त्यांची ऑनलाईन शाळा बंद करावी. कारण मुलांच्या देखील ऑनलाईन शाळा बंद झाल्या आहेत,” असं म्हणत रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला.