मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर १२ दिवसांनी त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली. नवनीत राणा यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता रवि राणा यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
“जेव्हा पोलीस आमच्या घरी आले होते तेव्हा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्हाला जामीन देण्यात येईल असे सांगितले. आम्ही वॉरंट मागत असतानाही त्यांनी तफकाफडकी आम्हाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गाडीत बसताना शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली,” असे रवि राणा म्हणाले.
“मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. कोर्टाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात. आम्हाला २० फूट खोल गाडण्याची धमकी देतात. संजय राऊतांवर महाराष्ट्रावर गुन्हा दाखल होत नाही. पण हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असे राणा म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारचा अहंकार असेल तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. अहंकारने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल,” असेही रवि राणा म्हणाले.
“संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्री यांच्यामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्सबाबत केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे. सत्तेचा दुरुपयोग करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही दिल्लीकडे करणार आहोत. येणाऱ्या काळात राम भक्त आणि हनुमान भक्त उद्धव ठाकरेंना जागा दाखवतील,” असेही राणा म्हणाले.