अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. “शिवसेना खासदार नवनीत राणा यांनी नाटक केल्याचा आरोप करत आहे. त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा व्हिडीओ रिलीज करावा,” अशी मागणी रवी राणा यांनी केली. ते सोमवारी (९ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
रवी राणा म्हणाले, “अनेक शिवसेना नेत्यांनी नवनीत राणा नाटक करत असल्याचा आरोप केला. नवनीत राणा आणि मला तुरुंगात टाकलं जातं आणि तरीही शिवसेनेचे नेते नाटक करत आहेत असं बोलत आहेत. मागील तीन दिवस नवनीत राणा यांच्यावर उपचार झालेत. ते जनतेपर्यंत पोहचलं आहे. आमच्यावर जो अन्याय झाला, मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र केलं ते माध्यमांमध्ये यायला हवं.”
“लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची व्हिडीओ रिलीज करा”
“जर त्यांना नवनीत राणा यांनी नाटक केलं असं वाटत असेल तर त्यांनी शांताकूल लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची व्हिडीओ रिलीज करावी,” अशी मागणी रवी राणा यांनी माध्यमांसमोर केली.
“उपमुख्यमंत्री म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पिलो; पण…”
रवी राणा पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पिलो. हो, जरूर चहा पिलो. आम्हाला जेव्हा अटक केली तेव्हा त्यांनी आमचे वकील आणि आम्हाला चहा पाजला. तसेच तुम्हाला जामीन देतो असं सांगण्यात आलं. साडेबारानंतर आम्हाला सांतक्रुजच्या तुरुंगात नेण्यात आलं. याची माध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आम्हालाही सांताक्रुजच्या लॉक अपमध्ये तुम्हाला बसवू आणि सकाळी न्यायालयात नेऊ असं सांगण्यात आलं.”
हेही वाचा : जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकार न्यायालयात जाणार, रवी राणा म्हणाले…
“आम्हाला पहाटे ५ वाजेपर्यंत पाणी आणि सतरंजी देखील दिली नाही”
“रात्री साडेबारानंतर नवनीत राणा यांना त्रास देण्यात आला. मी विधीमंडळाचा आमदार असतानाही मला त्रास दिला. पहाटे ५ वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजी देखील देण्यात आली नाही. त्या ठिकाणी खासदार नवनीत राणा यांना लॉक अपमध्ये उभं रहावं लागलं. त्या सकाळ्या परिस्थितीची अजित पवार यांनी माहिती घ्यावी. कारण राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे. एका महिला खासदाराला कशाप्रकारची वागणूक दिली गेली याचीही अजित पवार यांनी माहिती घ्यावी,” असंही रवी राणा यांनी सांगितलं.