मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचे बोलले जात असतानाच रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांना इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी काल अमरावतीत झालेल्या सभेत बोलताना, “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले रवी राणा?
“हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
हेही वाचा – VIDEO: “…तर त्या अधिकाऱ्याला उघडंनागडं करून मारल्याशिवाय सोडणार नाही”, राजू शेट्टींचा इशारा
“प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर दहादा माघार घायला तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे”, अशा इशाराही त्यांनी बच्चू कडू यांना दिला.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच मी माघार घेतली होती. कोणाचेही मन दुखायला नको, त्यामुळे हा वाद मिटवण्याचा मी प्रयत्न केला. पण वारंवार कोणी मला दम देत असेल, तर मलाही उत्तरं देता येतात”, असेही ते म्हणाले.