अमोल कीर्तिकरांच्या विरोधात अवघ्या ४८ मतांनी जिंकलेले शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी भूखंड घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात ‘सी समरी रिपोर्ट’ दाखल करण्यात आला. या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच रवींद्र वायकरांविरोधातले गुन्हे मागे घेतल्याचीही माहिती आहे. यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोस्ट लिहून राजकीय ब्लॅकमेलिंगचं आणखी एक उदाहरण म्हणजेच रवींद्र वायकर असं म्हटलं आहे.
काय आहे सचिन सावंत यांची पोस्ट?
शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते रविंद्र वायकर यांच्याविरोधातील पोलीस तपास आता बंद करण्यात येत आहे. वायकर यांचे प्रकरण हे राज्यात गेले दहा वर्षे चाललेल्या राजकीय ब्लॅकमेलचे अजून एक उदाहरण होय.
भाजपाच्या वॉशिंग मशीन ची क्रोनॉलॉजी समझिये –
किरीट सोमय्यांनी आरोप करायचे.. तक्रार करायची….मग तपास यंत्रणांचा ससेमिरा नंतर कुटुंबातील सदस्यांचा भयंकर छळ करुन भयभीत करायचे, मग भाजपाकडून पक्षात यायचा प्रस्ताव अन्यथा अजून छळाची धमकी, मग भाजपात किंवा भाजपाच्या सहकारी पक्षात पक्षप्रवेश नंतर यंत्रणांकडून क्लीन चिट. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर नेण्याचे पातक भाजपाने केलं आहे. किरीट सोमय्या या व्यक्तीमत्वाने राजकारण कलंकित केलं आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी सफाई केली. परंतु अजूनही ती अर्धवट अवस्थेत आहे. विधानसभा निवडणुकीत या हीन राजकारणाचा व वॉशिंग मशीनचा अंत जनतेच्या राजकारणाच्या सफाई अभियानातून होईल. अशी पोस्ट सचिन सावंत यांनी एक्स या समाजमाध्यमावर केली आहे.
हे पण वाचा- रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट, भूखंड घोटाळा प्रकरणात गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल
काय म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी अहवालात?
रवींद्र वायकरांविरोधातलं प्रकरण हे गैरसमजुतीतून आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे दाखल करण्यात आलं होतं. जोगेश्वरी येथील आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर अडचणींत आले होते. मात्र त्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपूर्ण माहितीच्या आधारे दिली गेली. या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण काय आहे?
मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात १३ हजार ६७४ चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी राखीव ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत ५०० कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं असा आरोप झाला. विशेष बाब म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सी समरी रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये मुंबई महापालिकेने गैरसमजातून आणि अपूर्ण माहितीच्या आधारे तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.