मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी अतिरिक्त धावपट्टी तयार करावी, त्याचप्रमाणे फनेल झोनच्या नियमांमुळे विमानतळाच्या आसपासच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडल्याने या नियमातही आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानांची संख्या वाढत असल्यामुळे अतिरिक्त धावपट्टी निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानांच्या वाढत्या संख्येमुळे विमानांना उतरण्यास धावपट्टी मोकळी मिळत नाही. त्यामुळे हवाई वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी विमानतळाजवळील झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी अतिरिक्त धावपट्टी तयार करणे आवश्यक आहे, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे. केंद्रीय उड्डयन मंत्री कींजरप्पु नायडू यांना त्यांनी याबाबत पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे विमानतळाच्या आसपासच्या इमारतींचा पुनर्विकास करताना फनेल झोलचा नियम पाळावा लागतो. या भागात इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहेत. फनेल झोनच्या नियमांमुळे विमानतळाच्या आसपासच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडल्याने या नियमातही आवश्यक ते बदल करावेत, अशीही मागणी वायकर यांनी पत्रात केली आहे.

हेही वाचा >>>Deepak Kesarkar : शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीला वेग; भाजपाकडून पाहणी, शिवसेनेत नाराजी? नेते म्हणाले, “मोठा भाऊ…”

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी या विषयाशी निगडीत सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची संयुक्त बैठक घेण्यात यावी. या बैठकीत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून ही समस्या सोडवण्यासाठी उचित पावली उचलणे आवश्यक आहे. येथील झोपड्यांचे पुनर्वसन करताना त्यांना चांगली घरे, पाणी व अन्य मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे, अशी सूचनाही वायकर यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra waikar demand to the central government regarding the rehabilitation of slums near mumbai international airport mumbai print news amy