चलनी नोटा आणि नाणी यांच्या वितरणासाठी असलेले काउंटर्स बंद करण्याच्या रिझर्व बँकेच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रिझर्व बँकेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी संपावर जाणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे कॅश विभागातील अनेक पदे अतिरिक्त ठरणार आहेत. त्याचप्रमाणे रिझर्व बँकेतील अधिकारी वर्गही सामुहिक नैमित्तिक रजा घेऊन या निर्णयाचा निषेध करणार आहेत.
रिझर्व बँकेद्वारे १९३५पासून चलनी नोटा आणि नाणी नागरिकांना थेट वितरित करता येतात. इतर सरकारी बँका फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व बँकेएवढय़ाच तत्पर नसल्याने नागरिकांना रिझर्व बँकेकडेच धाव घ्यावी लागते. त्यांना सेवा देणारे हे काउंटर्स बंद करण्याचा निर्णय मनमानी आणि एकतर्फी असल्याने युनायटेड फोरमने अनेकदा दाद मागितली.
मात्र रिझर्व बँक व्यवस्थापनाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आता एका दिवसासाठी १ जानेवारी रोजी रिझर्व बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
हे काउंटर्स बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून युनायटेड फोरमशी सौदार्हपूर्ण वातावरणात चर्चा करण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखवली, तर नियोजित संपाची वेळ येणार नाही, असे सांगितले आहे.