२००५ आधीच्या नोटा १ एप्रिलपासून व्यवहारातून बाद करण्याच्या आपल्याच निर्णयाला रिझव्‍‌र्ह बँकेने मुदतवाढ दिली असून आता १ जानेवारी २०१५ पर्यंत या नोटा व्यवहारात वापरता येणार आहेत. २००५ आधी छापण्यात आलेल्या पाच रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या सर्व नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या महिन्यात जारी केला होता.
बनावट नोटांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी २००५ नंतरच्या सर्व नोटा, ज्यांच्यावर छपाई वर्ष असेल, व्यवहारात ठेवण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने २२ जानेवारीला काढले होते. त्यानुसार २००५ आधीच्या आणि छपाईवर्ष नसलेल्या सर्व चलनी नोटा ३१ मार्चपर्यंत स्वीकारून त्या व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चलनात असलेल्या अशा नोटा बँकेत जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, आता रिझव्‍‌र्ह बँकेने ही मुदत वाढवून १ जानेवारी २०१५ पर्यंत या नोटा चलनात ठेवण्याचा निर्णय सोमवारी जारी केला. त्यामुळे आता छपाईवर्ष नसलेल्या चलनी नोटाही व्यवहारात वापरता येणार आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी प्रसिद्धीपत्रक पाठवून हा निर्णय जारी केला.
छपाईवर्ष नसलेल्या बहुसंख्य चलनी नोटा बाजारातून माघारी घेण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही काही प्रमाणात या नोटा चलनात आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत या नोटा माघारी घेणे व्यावहारिकदृष्टय़ा शक्य नसल्याने या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देऊन १ जानेवारी २०१५ पर्यंत या नोटा व्यवहारात ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  २००५ नंतर छपाई करण्यात आलेल्या चलनी नोटांवर सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक छपाई तपशील आहे. तसेच बनावट नोटांना आळा घालण्यासाठीही त्यावर विशेष प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळेच २००५ आधीच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला होता. आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या निर्णयामागे  आगामी लोकसभा निवडणुका याचा अर्थाअर्थी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

Story img Loader