Bomb Threat Emails to RBI HDFC ICICI: आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली आहे. (RBI Office Bomb Threat) ईमेलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांणध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा इ मेल आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या ई मेलवरुन ही धमकी देण्यात आल्याचं वृत्त आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब?
मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई मेल मंगळवारी दुपारी आला. दुपारी दीड वाजता बॉम्बस्फोट होतील असं सांगण्यात आलं. पोलिसांनी त्या प्रमाणे शोध मोहीमही राबवली पण काहीही आढळून आलं नाही.
आरबीआयच्या अधिकृत मेलवर धमकी देणारा ई मेल आला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. आरबीआयने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने शोध सुरु केला मात्र त्यांना काहीही आढळलेलं नाही. हा मेल कुठून करण्यात आला आणि त्यामागे कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
या मेलमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी भारतीय बँकांना लुटल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आमचं पाऊल उचलू अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये अशा प्रकारचे धमकीचे मेल आणि फोन अनेकदा येतात. पण आरबीआयच्या संदर्भात मेल आल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.