रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सकाळी आश्चर्यकारकरित्या रेपो दरात पाव टक्क्य़ांची कपात करून, कर्जावरील व्याजदरात कपातीचे संकेत देत अर्थसंक्रमणाला सुरुवात केली. यामुळे गृहकर्जाबरोबरच वाहन कर्जही स्वस्त होणार असल्याने सामान्यांना मकरसंक्रांतीचा तीळगूळ मिळाला आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँकांनी लगेचच कर्जावरील व्याजदरात कपातही केली. शेअर बाजार उघडण्यापूर्वीच आलेल्या या निर्णयाने तिथे दिवसभर तेजीचे उधाण आले होते. रुपयानेही डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरशीत आणखी १३ पैशांची भर घातली.
मध्यवर्ती बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जाचे दर अर्थात रेपो दर आठ टक्क्य़ांवरून ताबडतोबीने ७.७५ टक्क्य़ांवर आणत असल्याचे गुरुवारी सकाळी रिझव्र्ह बँकेने जाहीर केले. रेपो दरात यापूर्वी मे २०१३ मध्ये कपात झाली होती. रेपो दरातील या आकस्मिक कपातीसाठी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जुलै २०१४ पासून कमी होत आलेल्या महागाई दराचा हवाला दिला.
गृहकर्ज, वाहन कर्ज आदींवरील कर्जाच्या हप्त्यात दिलासा मिळेल अशी आपल्या किमान ऋणदरात पाव टक्क्य़ांची कपात ताबडतोबीने लागू करीत असल्याचे युनियन बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाने लगोलग जाहीर करून टाकले. देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदर कपातीच्या निर्णयाबाबत लवकरच विचार करण्याचे सूचित करून, नजीकचा काळ कर्जदरात स्वस्ताईचा राहण्याचे संकेत दिले आहेत. जानेवारीमध्ये महागाई दर ८ टक्क्य़ांवर विसावण्याचे रिझव्र्ह बँकेचे लक्ष्य असताना, हे दर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच त्यापेक्षा खाली उतरल्याचेही गव्हर्नर राजन यांनी ध्यानात घेतल्याचे दिसून येते.
बँकांकडून व्याज दरात पाव टक्क्य़ांचीही कपात केली गेली तर साधारण २० लाखाच्या २० वर्षे मुदतीच्या गृहकर्जाच्या मासिक हप्त्यामध्ये ३५० ते ४२५ रुपयांची सवलत कर्जदारांना मिळेल, असे सूत्रांकडून समजते.
गेल्या काही महिन्यात व्याजदरात कपातीचे कयास व्यक्त केले जात होते. परंतु रिझव्र्ह बँकेने नियोजित पतधोरण ३ फेब्रुवारीला म्हणजे पंधरवडय़ावर असताना, त्यापूर्वीच रेपो दर कपात करून सर्वानाच दिलासा दिला.
रेपो दरातील कपातीने सकारात्मक संदेश दिला असून, यामुळे सामान्यांच्या हाती अधिक पैसा येणार आहे. देशात गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार होईल.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री