लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: रस्त्यालगत उभ्या वाहनांमधील निरनिराळे भाग चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना आरसीएफ पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचे निरनिराळ्या वाहनांचे सुट्टे भाग पोलिसांनी हस्तगत केले.
चेंबूरजवळील माहुल परिसरातील म्हाडाच्या कॉलनीत राहणारे अजय माने यांनी आपली दुचाकी २० जून रोजी इमारतीखाली उभी केली होती. मात्र काही अज्ञात चोरांनी दुचाकीचे मागचे चाक आणि काही भाग काढून लंपास केले. याबाबत तरुणाने आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरसीएफ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांनी दोन दिवसांपूर्वी कृष्णा राजभर (२२) याला अटक केली.
हेही वाचा… मानसिक आजारातून बरे झालेल्यांना मदतीचा हात; राज्य सरकार उभारणार १६ पुनर्वसन केंद्र
कृष्णाने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. अकबर सय्यद (१९) याच्या मदतीने चेंबूर परिसरातून अशा प्रकारे ३२ दुचाकींचे भाग चोरल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अकबराला माहुलच्या म्हाडा कॉलनीतून अटक केली असून पोलिसांनी त्याच्या घरातून साडेसहा लाख रुपये किंमतीचे गाड्यांचे निरनिराळे सुटे भाग हस्तगत केले. हे सुटे भाग काही गॅरेज चालकांना विकण्यात येत असल्याचे उघडकीस आले असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.