मुंबई : आरे मार्गावरील मॉडर्न बेकरी बसथांबा ते आरे रुग्णालय या परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. मात्र, काही भागात काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात आले. आता या खड्ड्यांवर मातीचा भराव टकल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट ठेवून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवरील काही भागात पुन्हा खोदकाम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आरे मार्गावरही अनेक ठिकाणी काँक्रीाटीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम करण्यात आले होते. खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मातीने भराव टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. तसेच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

आरे मार्गावर मॉडर्न बेकरी बस थांबा ते आरे रूग्णालय या भागात काही दिवसांपूर्वी सुमारे आठ ते दहा खड्डे खोदण्यात आले आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी रस्ता रोधक (बॅरीकेट्स) उभे करण्यात आले होते. यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत होता. आता हे खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात येत असून वाऱ्यामुळे माती आसपासच्या परिसरात पसरत आहे. तसेच परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाला एक वर्षही पूर्ण झालेले नाही.

रस्ता सुस्थितीत असतानाही त्यावर सातत्याने खोदकाम केले जात असल्याचे तेथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी आरे दूध वसाहतीतील कॉंक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरही पुन्हा खोदकाम करण्यात आले होते. रस्त्यांच्या मधोमध उभ्या रेषेत खोदकाम केल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते.

कॉंक्रीटीकरण केल्यानंतर रस्त्यावर तडे कसे जातात, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईकरांना रुंद, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून वेगवान प्रवासाची अनुभूती मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी आरेमधील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाल्यामुळे संबंधित भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा कॉंक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.

Story img Loader