मुंबई : विक्रोळी, कन्नमवार नगर संक्रमण शिबिरातील ११ संक्रमण शिबिरार्थींना नवीन संक्रमण शिबिरातील घरे नाकारण्यात आल्याचा आरोप करीत एका महिलेने पैशांची माळ घालत, पैशांची उधळण करीत आंदोलन केले होते. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने या प्रकरणाच्या चौकशीअंतर्गत ११ अर्जदारांना दोन वेळा सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र अजूनही नऊ अर्जदार सुनावणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे आता ११ अर्जदारांना शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार २१ मार्चला तिसरी आणि अंतिम सुनावणी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी म्हाडा भवनातील दुरुस्ती मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर एका महिलेने गळ्यात पैशांची माळ घालून, पैशांची उधळण करत आंदोलन केले. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील ११ संक्रमण शिबिरार्थी मागील कित्येक वर्षांपासून नवीन संक्रमण शिबिरात घरे मिळावीत यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना घरे दिले जात नसून म्हाडा अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप या महिलेने त्यावेळी केला होता.

म्हाडाने मात्र हे आरोप फेटाळून ११ अर्जदारांच्या पात्रता निश्चितीचा निर्णय घेतला. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तटस्थ समितीने ११ अर्जदारांना २७ फेब्रुवारी रोजी सुनावणीला बोलावले होते. यावेळी अर्जदारांनी पात्रता निश्चितीच्यादृष्टीने सर्व कागदपत्रे सादर करणे अपेक्षित होते. मात्र या सुनावणीला एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे म्हाडाच्या तटस्थ समितीने या अर्जदारांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुसरी सुनावणी ६ मार्च रोजी पार पडली. मात्र यावेळी ११ पैकी केवळ दोनच अर्जदार उपस्थित राहिले.

दुसऱ्या सुनावणीस उपस्थित राहिलेल्या दोन अर्जदारांनी पात्रतेसंबंधीची कोणतीही कागदपत्रे यावेळी समितीला सादर केली नाहीत. त्यामुळे या दोघांसह सर्वच ११ अर्जदारांना शेवटची संधी देण्याचा निर्णय तटस्थ समितीने घेतला आहे. त्यानुसार २१ मार्च रोजी म्हाडा भवनात तिसरी सुनावणी होणार आहे. यावेळी ११ अर्जदारांनी उपस्थित राहून कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ही शेवटची संधी असून यावेळी उपस्थित राहणाऱ्या आणि कागदपत्रे जमा करणाऱ्या अर्जदारांची पात्रता निश्चिती करून संक्रमण शिबिरातील घरांच्या वाटपासाठीचा अहवाल समितीकडून म्हाडाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीस अर्जदारांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.