अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात १२ हजार ४५ मतदारांची नावे दुबार असून ती आता वगळण्यात येणार आहेत. तसेच या मतदार संघातील तब्बल ७५ हजार मतदारांची छायाचित्रेच अभिलेखात उपलब्ध नाहीत़  त्यामुळे संबंधितांनी ती त्वरीत जमा करावी, अन्यथा ती नावेही वगळण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ८ हजार मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३३ हजार मतदारांची छायाचित्रे उपलब्ध नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यात तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष अभियान राबवून ४५ हजार मतदारांची छायाचित्रे संकलीत केली. मतदार यादीबाबत आक्षेप घेण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आक्षेप घेतलेल्या मतदारांची सुनावणी होऊन दुबार तसेच मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.