मुंबई : माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत काही आक्षेप असल्यास पुन्हा सर्वेक्षण किंवा अभ्यास करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पेट्रोल-ड़िझेलचे दर अजून कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांठिया आयोगाने राज्यातील ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणानंतर काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष असून हा अहवाल राज्य सरकारने फेटाळून लावावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. याविषयी विचारता फडणवीस म्हणाले, ज्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, ते या अंतिम टप्प्यात जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या सरकारच्या कार्यकाळात हा आयोग झाला, त्याच पक्षांचे नेते आज वेगळी भूमिका घेऊन अहवालाला विरोध करीत आहेत. बांठिया आयोगाचा अहवाल हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणापुरता असून त्यांना २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. पण आयोगाने निश्चित केलेल्या अंतिम लोकसंख्येबाबत कोणाचे काही मत असेल, तर आणखी सर्वेक्षण किंवा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारची नेहमीच तयारी आहे.

नक्की वाचा >> “जर मुलं सात वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश नऊ वाजता कामाला सुरुवात का करु शकत नाहीत?”

राज ठाकरे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ही भेट घेतली व त्याबाबत विधिमंडळातच मी जाहीर केले होते. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी राज ठाकरे यांना भेटल्याने कोणालाही मळमळ होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.