संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची प्रकाश आंबेडकर यांची अट
केंद्रात सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तर त्यांच्याशी युती करण्याची आमची तयारी आहे याचा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील विराट सभेत केला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची आठवण करून देणारी सभेला तुफान गर्दी झाली होती.
यावेळी राजकीय भूमिका मांडताना आंबेडकर यांनी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस वरही टीकेची झोड उठविली. भाजप जहाल हिंदुत्ववादी आहे तर काँग्रेस स्वताला सौम्य िहदुत्ववादी समजते त्यामुळे हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे आम्ही मानतो. आमचे भांडण किती जागा मिळाव्यात यासाठी नाही, काँग्रेस तसा प्रचार करीत आहे. आमचे भांडण तत्वाचे आहे. काँग्रेसने जुन्या काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी आणि संविधानविरोधी असलेल्या संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची हमी द्यावी आम्ही त्यांच्या बरोबर निवडणूक समझोता करायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. काँग्रेस, शिवसेना किंवा भाजप यांच्याकडून निवडणूक लढविणाऱ्या बांधकाम व्यावसायिक उमेदवाराला मतदान करु नका असे आवाहन आंबेडकर यांनी केले. कारण मुंबईतील कोळीवाडे व गावठाणे यांच्या जमिनीवर लक्ष्य असल्याचा आरोपही केला.
एमएमआयचे अध्यक्ष खासदार असदुददीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप वर हल्लाबोल करतांना ७० वष्रे सत्ता भोगणारे काँग्रेसही मुसलमानांच्या अधोगतीला कारणीभूत आहेत असा आरोप केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा आरोपही त्यांनी केला. या हल्लाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.