अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत नामदेव यांच्या ‘घुमान’ला यंदा बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषक रसिक आपली खास उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या या उपस्थितीमुळे यंदाचे ८८ वे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने ‘अखिल भारतीय’ ठरणार आहे.
मराठी भाषा आणि साहित्याचा शब्दोत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यंदा हरियाणा, जम्मू-काश्मीर, नवी दिल्ली, पानिपत, अांध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसह हिमाचल प्रदेश येथील मराठी भाषक आपली खास हजेरी लावणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध भागांत होणारे साहित्य संमेलन यंदा बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्राबाहेर होणार आहे. महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषक मंडळी मोठय़ा प्रमाणात गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. या मंडळींनी तेथील भाषा आणि संस्कृती आत्मसात केली असली तरी मराठीशी असलेली आपली मूळ नाळ तोडलेली नाही. त्यामुळे घुमान येथे होणारा हा ‘मायबोली’चा उत्सव बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषकांसाठी आनंद सोहळा ठरला आहे.
‘पानिपत’ येथूनही मराठी समाज घुमानला खास उपस्थित राहणार आहे. जम्मू-काश्मीरमधील मराठी भाषकांच्या एका समूहानेही आपण या संमेलनाला हजर राहणार असल्याचे ‘सरहद’ या संमेलन आयोजक संस्थेच्या संजय नहार यांना कळविले आहे. तसेच आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, नवी दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश येथूनही मराठी भाषक संमेलनास हजर राहणार आहेत.
हिमाचल प्रदेशात नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास असलेले कीर्ती इंगळे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, आमच्या येथील ‘पंजाब केसरी’ या वृत्तपत्रात साहित्य संमेलनाची बातमी आली होती. ती बातमी वाचून येथील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांमध्ये चर्चा झाली आणि आम्ही काही जणांनी या संमेलनाला जायचे नक्की केले आहे. चंदीगढ येथेही ‘महाराष्ट्र भवन’ आहे. तेथील मराठी मंडळींमध्येही संमेलनाविषयी चर्चा झाली आहे. मराठी भाषेचा हा उत्सव बृहन्महाराष्ट्रातील मराठी मंडळींसाठी आनंदाचा सोहळा आहे, असेही नहार म्हणाले.
बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषकांचीही ‘घुमान’ची वारी!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत नामदेव यांच्या ‘घुमान’ला यंदा बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषक रसिक आपली खास उपस्थिती लावणार आहेत.
First published on: 14-03-2015 at 02:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Really akhil bharatiya marathi sahitya sammelan