मुंबई : ठाणे-दिवादरम्यानची पाचवी-सहावी मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतरही सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकलेली नाही. तसेच विविध कारणांनी लोकल विलंबाने धावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ऐन गर्दीच्या वेळी लोकल प्रवाशांचा प्रवास विलंबाने होत आहे. तांत्रिक बिघाड, देखभाल – दुरुस्ती, लोकल-मेल व एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन याकडे मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून होऊ लागला आहे. वारंवार उपनगरीय लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याने प्रवाशांचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वे उपनगरीय वेळापत्रक सातत्याने विस्कळीत होत असून वक्तशीरपणात मध्य रेल्वे अपयशी ठरत आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसच्या इंजिनमधील बिघाड होत असून देखभाल-दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेने केलेला दावा फोल ठरत आहे. ऐन गर्दीच्या वेळी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. ठाणे-दिव्यादरम्यानचा पाचवा-सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सामान्य लोकलच्या फेऱ्या वाढणे गरजेचे होते. परंतु सामान्य लोकलऐवजी वातानुकूलित लोकलडीला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. प्रथम वेळापत्रक सुरळीत करावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. यासाठी येत्या आठवड्यात प्रवासी संघटना मध्य रेल्वे प्रशासनाशी चर्चा करेल, असे ‘उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थे’चे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुंबईत डोळ्यांची साथ; नागरिकांनी जागरुक राहण्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे अवाहन
देखभाल दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करून दर रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रेल्वे विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेत आहे. मात्र त्यानंतरही तांत्रिक बिघाड होऊन लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. गर्दीच्या वेळी पंधरा ते वीस मिनिट लोकल उशिराने धावतात. मात्र याचे मध्य रेल्वेला काहीच सोयरसूतक नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध कारणांमुळे लोकल विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेबरोबरच रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार किंवा ट्वीटद्वारे गाऱ्हाणे मांडून लोकल सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात येईल, असे ‘रेल यात्री परिषदे’चे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
प्रवासी संघटनांकडून मागणी करण्यात आलेली नसतानाही सामान्य लोकलची संख्या कमी करून वातानुकूलित लोकलची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक अनेक तांत्रिक बिघाड होत आहेत. तसेच ठाणे-दिवा पाचवा-सहाव्या मार्गावरून मेल-एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजनही चुकत आहे. परिणामी, कसारा, कर्जत, खोपोलीपर्यंतच्या प्रवाशांना सकाळी कार्यालयात, तर रात्री घरी पोहोचण्यास दररोज २० ते २५ मिनिटे विलंब होत आहे. काही वेळा अचानक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. तांत्रिक अडचणींचे करण पुढे करून वेळ मारून नेणाऱ्या रेल्वे प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.
मध्य रेल्वेवरील लोकलमधून सकाळी किंवा सायंकाळी प्रवास करताना अनेक वेळा स्थानकांमध्ये लोकल विलंबाने धावत असल्याची उद्घोषणा होत असते. महिन्यातून अनेक वेळा लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असते. ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेनंतर सामान्य लोकल फेऱ्याही वाढविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांना वाऱ्यावर सोडले की काय अशी भावना निर्माण झाली आहे.
-मुकुंद चरकरी, डोंबिवली रहिवासी
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – कल्याणदरम्यानच्या मुख्य मार्गावर धावणारी वातानुकूलित लोकल अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळासाठीही चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतला होता. ठाणे – दिवा पाचव्या, सहाव्या मार्गामुळे १९ फेब्रुवारीपासून आणखी ३६ लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या असून यामध्ये ३४ फेऱ्या वातानुकूलित आणि दोन विनावातानुकूलित लोकलच्या फेऱ्याचा समावेश केला. १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून (व्हिडीओ काॅन्फरन्स) ठाणे – दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकेनंतर सामान्य फेऱ्यातही वाढ होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात होते. मात्र लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकलेली नाही. उलटपक्षी लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होऊन त्याचा प्रवाशांना फटका बसत आहे. याबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.