कोकणातील शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेनेच्या विरोधात तोफ डागत मनसेत प्रवेश करण्याची तयारी दाखवली असली तरी तूर्तास मनसेने त्यांना ‘नो एंट्री’ केली आहे. उद्या कोणीही उठेल आणि मनसेत येतो म्हणेल. मनसे ही काही धर्मशाळा नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेप्रमुखांचे नुकतेच निधन झालेले असताना अशाप्रकारे शिवसेनेतून येणाऱ्यांना मनसेत प्रवेश देऊन शिवसेना फोडण्याचा शिक्का मारून घेण्यास राज ठाकरे तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केवळ पदांच्या अपेक्षेने शिवसेनेतून मनसेत कोणी येणार असेल तर त्याला घेतले जाणार नाही, अशी भूमिका राज यांनी मांडली आहे. परशुराम उपरकर यांनी गोव्यात राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सध्या तुम्हाला मनसेत घेता येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केल्यानंतरही उपरकर यांनी मनसे प्रवेशाचा प्रचार केला. शिवसेनेतील अनेक नाराज मनसेत येण्याच्या तयारीत असले तरी मनसेने त्यांना हिरवा कंदिल दाखवलेला नाही. राज यांनी पक्ष काढल्यानंतर मनसेतून बाहेर पडलेल्या नाराजांना मोठय़ा सन्मानाने शिवसेनेत घेण्यात आले होते. एवढेच नव्हे तर उपनेत्यासारखी महत्त्वाची पदेही देण्यात आली होती. शिवसेनेतून माजी आमदार नंदू साटम, पालिका सभागृहनेते दिगंबर कांडारकर आदींनी मनसेत प्रवेश केला होता. मात्र राजकीय लाभ होत नसल्याचे दिसताच त्यांनी मनसेला रामरामही केला. या पाश्र्वभूमीवर सेनेतून मनसेत प्रवेश देण्याबाबत सावध भूमिका घेण्यात येत आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर तर विशेष सावधगिरी बाळगण्यात येत आहे. मनसेच्या एका ज्येष्ठ आमदाराच्या म्हणण्यानुसार प्रामुख्याने ग्रामीण भागातील आमदार व सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी असून यातील काहीजण आमच्या संपर्कात आहेत. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी सध्या पक्षबांधणीवर लक्ष देण्यात येत असून चांगले कार्यकर्ते पक्षात येणार असतील तर त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र सेना अथवा अन्य पक्ष फोडण्याचे उद्योग मनसे करणार नाही. ठाण्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडण्याचे काम शिवसेनेने केल्यानंतर शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनाच फोडून राष्ट्रवादीने ‘सौ सुनार की एक लुहार की’चा झटका दिला होता. पक्ष फोडून पक्ष वाढविण्यावर मनसेचा विश्वास नसल्याचे राज यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले असल्यामुळे राजकीय स्वार्थासाठी येणाऱ्यांना मनसेत ‘नो ऐंट्री’ असेल असेही हा आमदार म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2013 रोजी प्रकाशित
शिवसेनेतील फुटीरांना मनसेत ‘नो एंट्री’ !
कोकणातील शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेनेच्या विरोधात तोफ डागत मनसेत प्रवेश करण्याची तयारी दाखवली असली तरी तूर्तास मनसेने त्यांना ‘नो एंट्री’ केली आहे. उद्या कोणीही उठेल आणि मनसेत येतो म्हणेल. मनसे ही काही धर्मशाळा नाही,
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-01-2013 at 04:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel leader of shiv sena prohibited in mns