मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळ समोर आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि भाजपने त्यांना पािठबा देण्याची तयारी दर्शविली. दुसरीकडे नागपुर शिक्षक मतदारसंघातही आघाडीतील तिन्ही पक्षांनी अर्ज दाखल केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असून, पाचही मतदारसंघांमध्ये भाजपने आव्हान उभे केले आहे. नाशिक व अमरावती पदवीधर, नागपूर, कोकण, औरंगाबाद शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाटय़मय घडामोडी घडल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने सकाळी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली. मात्र मुदत संपेपर्यंत डॉ. तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
सत्यजित यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी पक्षाकडे मागणी केली होती. परंतु पक्षाने त्यांची मागणी मान्य केली नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजित यांचे मामा. थोरातांनी आपल्या साडूऐवजी भाच्याच्या नावाची शिफारस का केली नाही, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. या गोंधळामुळे नाशिकची हक्काची जागा काँग्रेसला गमवावी लागली आहे. तांबे निवडून आले तरीही हे अपक्ष आमदार असतील. बाळासाहेब थोरात यांनी हा विषय योग्यपणे हाताळला नाही. त्यातूनच पक्षाची नाचक्की झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाने उमेदवारी जाहीर केलेले डॉ. तांबे यांनी अर्ज का भरला नाही याची चौकशी करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विशेष म्हणजे भाजपनेही जाहीर केलेल्या उमेदवाराला पक्षाचे अधिकृत पत्र (ए-बी फॉर्म) दिलेले नाही. यामुळे तो उमेदवारही अपक्षच ठरला आहे. २९ जणांनी ४४ अर्ज दाखल केले असले तरी आता राष्ट्रीय किंवा मान्यताप्राप्त पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नाही.
फडणवीस यांची मदत?
सत्यजित तांबे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. अलीकडेच तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा ‘सत्यजित यांना असे मोकळे ठेवू नका, नाहीतर आमची नजर जाते’, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी भाषणात केले होते. सत्यजित तांबे यांनी अर्ज भरल्यानंतर पाठिंबा मागितल्यास पक्षाच्या केंद्रीय पातळीवर विचार केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. यावरून फडणवीस काँग्रेसला धडा शिकविण्याकरिता सत्यजित यांना मदत करण्याची शक्यता वर्तविली जाते.
नागपूरमध्येही गोंधळ
नागपूर शिक्षक मतदारसंघ आघाडीत शिवसेनेला सोडण्यात आला. मात्र तिथे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही घटक पक्षांच्या उमेमदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक शिक्षक संघटनांचा विरोध आहे. हा गोंधळ निस्तारण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
भाजपचे तगडे आव्हान
पाचही मतदारसंघांमध्ये भाजपने महाविकास आघाडीपुढे आव्हान उभे केले आहे. या पाचापैकी तीन जागा महाविकास आघाडी तर दोन जागा भाजपकडे होत्या. या पाच जागांवर लढतीचे चित्र असे असेल..’नाशिक पदवीधर : महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. काँग्रेसने निवडणुकीआधी जागा गमवली
कोकण शिक्षक : विद्यमान आमदार बाळाराम पाटील (शेकाप) आणि भाजपने शिंदे गटाकडून आयात केलेल ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत.
’अमरावती पदवीधर : भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात काँग्रेसकडून धीरज लिंगाडे या मूळच्या
शिवसेना नेत्याला उमेदवारी. काँग्रेसमधून कुणीही इच्छुक नाही.
नागपूर शिक्षक : भाजपचे विद्यमान आमदार नागा गणोर यांच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे उमेदावर रिंगणात
’औरंगाबाद शिक्षक : राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांच्या विरोधात भाजपकडून मूळचे काँग्रेसी किरण पाटील यांना उमेदवारी
मी काँग्रेसचाच उमेदवार – तांबे
मी काँग्रेस पक्षाचाच आहे. तरुणांना संधी मिळावी म्हणून वडिलांनी अर्ज दाखल केला नाही. मला पक्षाचे अधिकृत पत्र (ए-बी फॉर्म) वेळेत मिळू शकले नाही. यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, असे स्पष्टीकरण सत्यजित तांबे यांनी दिले. सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले.