मुंबई : मुंबईत टॅक्सी आणि रिक्षांचे सुधारित भाडे लागू होऊन ११ दिवस उलटले तरीही मीटरचे रिकॅलिब्रेशन अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे चालक आणि प्रवाशांमध्ये टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यावरून वाद होऊ लागले आहेत. राज्य परिवहन विभागाने लागू केलेल्या नवीन भाड्यांमध्ये चालकांना त्यांचे मीटर रिकॅलिब्रेट करावे लागते किंवा विभागाने जारी केलेले क्यूआर कोड आधारित टॅरिफ कार्ड प्रदर्शित करावे लागते. तथापि, रिकॅलिब्रेशन प्रक्रियेतील विलंबामुळे अनेक चालकांना सुधारित दर आकारता येत नाहीत.
इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मान्यता दिली. यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रूपये झाले आहे.
टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची अंमलबजावणी झाली असून, मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मीटर रिकॅलिब्रेशन करता आलेले नाही. सरकारने भाडेवाढ जाहीर केली. परंतु, मीटर रिकॅलिब्रेशन अद्याप सुरू झालेले नाही. त्याव्यतिरिक्त, मीटर दुरुस्ती करणारे या प्रक्रियेसाठी अतिरिक्त पैसे मागत आहेत, असे एका टॅक्सीचालकाने सांगितले.
वाहनांचे १ फेब्रुवारी २०२५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान मीटर रिकॅलिब्रेट करणे आवश्यक आहे. या कालावधीत सुधारित भाडेपत्रिका वैध राहणार आहे.रिकॅलिब्रेशन प्रक्रिया जलद करण्याचे प्रयत्न सुरू आहोत. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि सर्व समस्या सुटतील, असे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
रिक्षा-टॅक्सीच्या सुधारित भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर मीटरमध्ये बदल करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. मीटरमध्ये नवीन दर दिसण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे, मीटर पासिंग करणे या प्रक्रियेसाठी परिवहन आयुक्तालयाकडून ७०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी ७०० रुपये दर अधिक आहे. याऐवजी ५०० रुपये आकारणी करावी. काही दलाल प्रत्यक्षात ७०० रुपये, अधिक २५० रुपये असे एकूण ९५० रुपये घेत आहेत, असे एका टॅक्सीचालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. मीटर अद्ययावत होईपर्यंत प्रवाशांकडून सुधारित भाडे घेण्यासाठी परिवहन विभागाने नव्या भाडेदराचा तक्ता प्रकाशित केला आहे. मात्र, डिजिटल मीटर असताना कागदी तक्ता पाहून जादा भाडे देण्यास प्रवाशांकडून नकार देत आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वाद होत आहेत.