लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी अशा पहिल्या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र अखेर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) प्राप्त झाले आहे. आरे – बीकेसी मार्गिकेची चाचणी पूर्ण करून गुरुवारी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आता १२.५ पाच किमीच्या आरे-बीकेसी भुयारी मेट्रो मार्गिकेतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रो मार्गिकेचे जाळे विणले जात आहे. याच मेट्रो प्रकल्पातील ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेच्या उभारणीची जबाबदारी ‘एमएमआरसी’कडे आहे. या मार्गिकेतील १२.५ किमीच्या आरे – बीकेसी अशा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘एमएमआरसी’ने घेतला होता. मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी ‘सीएमआरएस’कडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक असते. या प्रमाणपत्राशिवाय कोणतीही मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करता येत नाही. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील दीड- दोन महिन्यांपासून सीएमआरएस चाचण्या करून घेत सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
दरम्यान, या चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाविण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असून हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ लागत होता. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी भुयारी मेट्रोचे संचलन करणे ‘एमएमआरसी’साठी आवश्यक होते. मात्र आचारसंहितेपूर्वीच आरे – बीकेसी टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याची ठाम भूमिका राज्य सरकार आणि ‘एमएमआरसी’ने घेतली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यावरही सरकार ठाम होते. त्यामुळेच मागील १५ दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने चक्रे वेगाने फिरली. ‘सीएमआरएस’च्या चाचण्यांना केंद्र सरकारकडून वेग देण्यात आला आणि अखेर गुरुवारी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात ‘एमएमआरसी’ यशस्वी ठरली.
सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याआधीच राज्य सरकारकडून आरे – बीकेसी टप्प्याच्या लोकार्पणासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. पंतप्रधान ५ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने यावेळी भुयारी मेट्रोचे लोकार्पण करण्याचे निश्चित करून यासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र ५ ऑक्टोबरच्या आधी प्राप्त करून घेण्याचे आव्हान सरकार आणि ‘एमएमआरसी’समोर होते. त्यानुसार मागील चार-पाच दिवसांपासून ‘सीएमआरएस’च्या चाचण्यांना वेग देण्यात आला होता.
अखेर गुरुवारी सर्व चाचण्या पूर्ण करून आरे – बीकेसी टप्प्यासाठी ‘सीएमआरएस’ने सुरक्षा प्रमाणपत्र दिल्यानंतर या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता ५ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण होईल आणि मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो वाहतूक सेवेत दाखल होईल. भुयारी मेट्रो वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांचे पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तर आरे – बीकेसी असा प्रवास सुकर आणि अति वेगवान होईल. दरम्यान, आरे – बीकेसी अंतर केवळ २२ मिनिटांत भुयारी मेट्रोने पार करता येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेस चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र त्याच वेळी बीकेसी – कफ परेड भुयारी मेट्रो प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना एप्रिल – मे २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.