करोनाविरुद्ध सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या लढ्याला बळ देणारी घटना आज घडली आहे. महाराष्ट्रातील लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने मागणी परवानगी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना परवानगी बाबत एक पत्र पाठवले आहे. “वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी” असे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

 

Story img Loader