मुंबई : वरळी अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शहाचा चालक परवाना रद्द करण्याबाबत मुंबई पोलीस प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पत्र लिहिणार आहेत. आरोपीने पालघर येथील ‘आरटीओ’मधून चालक परवाना मिळवला होता.
आरोपी मिहीर याने पालघर येथील ‘आरटीओ’ कार्यालयातून चालक परवाना मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस लवकरच तेथील ‘आरटीओ’ विभागाला पत्र लिहून आरोपी मिहीरचा चालक परवाना रद्द करण्यास सांगणार आहेत. आरोपीने भरधाव वेगाने मोटरगाडी चालवून दारूच्या नशेत हा अपघात केला होता.
हेही वाचा – सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…
अपघाताच्या दिवशी मिहीरच्या बोरिवली येथील घरापासून मरिन ड्राईव्हपर्यंत चालक राजऋषी बिडावत मोटरगाडी चालवत होता. तेथे मिहीरने मोटरगाडी थांबवण्यास सांगितले व गिरगाव चौपाटीपासून मिहीर मोटरगाडी चालवू लागला. सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी त्याने प्रदीप नाखवा व त्यांची पत्नी कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला वरळी येथील लँडमार्क शोरूमसमोर धडक दिली. तेथून कावेरी यांना फरफटत नेले. त्यानंतर कावेरी यांचा मृत्यू झाला.