मुंबई – घाटकोपर येथील साईनाथ नगर क्रमांक २ महापालिका शाळा पूर्णपणे पाडून इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. ही चार मजली शाळा १९७३ मध्ये बांधण्यात आली होती. ४१ वर्षे जुनी ही शाळा आता पालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षाच्यावतीने नव्याने बांधण्यात येणार आहे.
नव्याने बांधण्यात येणारी शाळा ही तळमजला अधिक सहा मजले अशी असेल. शाळेत तळ मजल्यावर एक सभागृह, विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह, वरच्या मजल्यांवर वर्गखोल्या, शौचालये आहेत. अपंगांसाठी प्रत्येक मजल्यावर एक शौचालय असेल. एकूण साडेतीन हजार चौरस मीटर बांधकामाचे क्षेत्र असून या कामासाठी पालिका १९ कोटी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. सर्व कर आणि सल्लागारांचा खर्च, विद्युत जोडणी मिळून हा खर्च २३ कोटी ८३ लाखांवर जाणार आहे. या कामासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचा – मोदींविरोधात लढण्यासाठी एकीची शक्यता कमीच; प्रकाश आंबेडकर यांची टीका
महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या ४७६ शाळा इमारती आहेत. पालिकेच्या मालकीच्या २७ शाळांची पुनर्बांधणीची कामे सध्या सुरु आहेत. अनेक शाळांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत. या सर्व कामांसाठी चालू अर्थसंकल्पात २८४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.