मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रमी टप्पा पार केला आहे. २७ सप्टेंबरला या मार्गिकेवरून तब्बल ४ लाख ७९ हजार ३३३ प्रवाशांनी प्रवास केला. करोना काळानंतर पाहिल्यांदाच मेट्रो १ ने विक्रमी प्रवासी संख्या गाठली आहे. मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळखली जाणारी मेट्रो १ मार्गिका २०१४ पासून सेवेत दाखल आहे. या पहिल्या मार्गिकेला मुंबईकरांची बऱ्यापैकी पसंती मिळताना दिसते. परिणामी दररोज लाखो प्रवासी मेट्रो १ ने प्रवास करताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो १ ने आपली दैनंदिन अपेक्षित प्रवासी संख्या गाठली नसली तरी दैनंदिन प्रवासी संख्या समाधानकारक असल्याचे चित्र आहे. करोना काळाआधी या मार्गिकेवरुन दिवसाला ४ लाख ४० हजार ते ४ लाख ६५ हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र करोना काळाचा मोठा फटका या मार्गिकेला बसला. मार्च ते ऑक्टोबर २०२० दरम्यान ही मार्गिका पूर्णतः बंद होती. ऑक्टोबरमध्ये मेट्रो १ वाहतूक सेवेत दाखल झाली. मात्र करोना नियमानुसार ५० टक्के क्षमतेने मेट्रो १ धावत आल्याने आणि कमी फेऱ्या असल्याने या काळात काही हजार प्रवाशी मेट्रो १ ने प्रवास करत होते. मात्र करोना निर्बंध हटविण्यात आल्यानंतर मेट्रो १ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागली. हळूहळू दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाख आणि पुढे चार लाखांवर गेली. तर आता पहिल्यांदाच मेट्रो १ ने दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रमी टप्पा पार केला आहे.

हेही वाचा >>> तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो १ विस्कळीत

मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरला या मार्गिकेवरून तब्बल ४ लाख ७९ हजार ३३३ प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गिकेवरील ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. मेट्रो १ मार्गिकेमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाणे सोपे होत असल्याने या मार्गिकेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. यात आता मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) या दोन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्याने याचाही फायदा मेट्रो १ ची दैनंदिन प्रवासी संख्या वाढण्यास झाला आहे. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका मेट्रो १ शी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढताना दिसत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record break passengers traveled on metro 1 line on september 27 mumbai print news ysh