मुंबई : सलग दोन वर्षे झालेला दमदार पाऊस, चारा-पाण्याची चांगली उपलब्धता, सहकारी आणि खासगी दूध संघांकडून स्पर्धात्मक दराने दूध खरेदी आणि सरकारी अनुदानामुळे समाधानकारक दर यामुळे आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये राज्यात प्रति दिन दूध संकलन विक्रमी १ कोटी ७१ लाख १८ हजार लिटरवर गेले. दुग्ध व्यवसाय विभागाने ही माहिती दिली असून, हे आजवरचे सर्वाधिक दूध संकलन ठरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१६-१७ मध्ये दुधाचे जागतिक दर १७ रुपये प्रति लिटरवर आले होते. यंदा जागतिक पातळीवरही दूध उत्पादनात वाढ झाली आहे. बटर आणि दूध भुकटीच्या दरात घसरण झाल्यामुळे राज्यात दूध खरेदी दर २५ रुपयांवर आले. या काळात सरकारी अनुदानाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सरकारने अनुदानासाठी ७५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर काळात संकलित झालेल्या दुधाच्या अनुदानापोटी सरकारने आजवर ५३८ कोटी रुपयांचे वितरण केले आहे, तर १५३ कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे.

खासगी आणि सहकारी ४७१ दूध संघांकडून दूध खरेदी आणि प्रक्रिया होते. सरकारी अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी स्पष्ट केले.

वर्षनिहाय संकलन

प्रति दिनलाख लिटर

२०१९-२० ११६.४१

२०२०-२१ ११६.९९

२०२१-२२ १२१.५१

२०२२-२३ १२४.९५

२०२३-२४ १७१.१८

भेसळ रोखण्यासाठी संयुक्त कार्यवाही

●भेसळीस आळा घालण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुग्ध व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा त्यांनी आढावा घेतला.

● भेसळीवर समन्वयाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत संयुक्तरीत्या मोहिमा राबविण्यात येतील, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year amy