मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला प्रवाशांची पसंती वाढत असून आतापर्यंत दिवसाला साडेचार लाखांहून अधिक प्रवाशी ‘मेट्रो १’मधून प्रवास करीत होते. मात्र मंगळवारी पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी ‘मेट्रो १’मधून प्रवास केला. हा प्रवासी संख्येचा विक्रमी असून पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी संख्येने पाच लाखांचा पल्ला पार केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ ही मुंबईतील पहिली वाहतूक सेवेत दाखल झालेली मार्गिका आहे. ही मार्गिका २०१४ पासून कार्यान्वित असून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे (एमएमओपीएल) या मार्गिकेची मालकी आणि संचलन – देखभालीची जबाबदारी आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी एमएमओसीएलकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ या दोन मेट्रो मार्गिका ‘मेट्रो १’ला जोडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच ‘मेट्रो १’वरील प्रवासी संख्येने मंगळवारी पाच लाखांचा पल्ला पार केला आहे. दरम्यान ऑगस्टमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या चार लाख ८५ हजाराच्या आसपास होती. ‘मेट्रो १’ मार्गिकेवरून मंगळवारी दिवसभरात पाच लाख ३८५ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली.
हेही वाचा – म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींमधील रहिवाशांचा २८ ऑगस्टला म्हाडा मुख्यालयावर मोर्चा
हेही वाचा – तरूणांमध्ये हर्नियाच्या त्रासात २० टक्के वाढ!
मागील काही महिने दिवसाला ४ लाख ४० हजार ते ४ लाख ६५ हजार प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करीत होते. असे असताना मंगळवारी पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. करोना काळापूर्वी २०१९ मध्ये ‘मेट्रो १’च्या प्रवासी संख्येने पाच लाखांचा पल्ला पार केला होता. यावेळी पाच लाख २० हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र यावेळी बेस्ट बसचा संप असल्याने ‘मेट्रो १’वरील प्रवासी संख्या वाढली होती. पण मंगळवारी मात्र खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच ‘मेट्रो १’वरील प्रवासी संख्या पाच लाखांच्या पुढे गेली होती. दरम्यान, २७ सप्टेंबर २०२३ रोजी या मार्गिकेवरून तब्बल ४ लाख ७९ हजार ३३३ प्रवाशांनी प्रवास केला होता. करोनाकाळानंतरची ही सर्वाधिक अशी दैनंदिन प्रवासी संख्या होती. वाढ होऊन ती आता पाच लाखांपर्यंत पोहचली आहे.
© The Indian Express (P) Ltd