मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील तीन व्यावसायिक भूखंडांच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच खुल्या केल्या. या ई-लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला दोन भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार आहेत. या व्यवहारात आतापर्यंतचा विक्रमी दर मिळाला असून यामुळे एमएसआरडीएच्या तिजोरीत ३८३९ कोटी रुपये जमा होणार आहेत.
पूर्वी एमएमआरडीएला ३ लाख ४४ हजार रुपये प्रति चौ. मीटरचा सर्वाधिक दर मिळाला होता. मात्र आताच्या व्यहारात एका भूखंडासाठी ४ लाख ८२ हजार ९२२ रुपये आणि दुसऱ्या भूखंडासाठी ४ लाख ८० हजार ९४५ रुपये प्रति चौ. मीटरचा सर्वोच्च दर मिळाला आहे. लवकरच या तिन्ही भूखंडांच्या निविदा अंतिम करत विक्रीची प्रक्रिया अंतिम केली जाईल.
जपानच्या मेसर्स गोईसू रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (सुमीतोमो) कंपनीने ७०७१.९० चौ. मीटर क्षेत्रफळाच्या ‘सी १३’ भूखंडासाठी ४,८०,९४५ रुपये प्र. चौ. मीटर दराने १३६०.४८ कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली. ६०९६.६७ चौ.मीटरचा ‘सी १९’ भूखंडही याच कंपनीने ११७७.८६ कोटींची (प्र. चौ.मीटर ४,८२,९९२ रु.) बोली लावत जिंकला. ‘सी ८० या भूखंडासाठी ‘श्लॉस बंगळूरु आणि अर्लिगा इकोस्पेस बिझनेस पार्क’ (संयुक्त) कंपनीने १३०२.१६ कोटी रुपयांची (प्रति चौ. मीटर ३,८७,००० रुपये) बोली लावत बाजी मारली.
मेट्रोसह अन्य प्रकल्पांना गती
एमएमआरडीएच्या या तीन व्यावसायिक भूखंडविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता त्यांची प्रत्यक्षात विक्री होणार आहे. एमएमआरडीएकडून आता पुढील प्रक्रिया पूर्ण करत भूखंडाची रक्कम भरून घेत भूखंडाचा ताबा येत्या काही महिन्यांत विजेत्या कंपन्यांना दिला जाईल. या भूखंडांच्या विक्रीतून ३८३९ कोटी रुपयांची घसघशीत रक्कम एमएमआरडीएच्या तिजोरीत येणार असून त्यामुळे महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांसह अन्य काही योजना मार्गी लावणे शक्य होणार आहे.