मुंबई : नवरात्रीपासून दिवाळी भाऊबीजेपर्यंत म्हणजे १५ ॲाक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत १२ हजार ६०० घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात दहा हजार घरांची विक्री झाली होती. हा टप्पा यंदाच्या घरविक्रीने पार केला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत १२५७ कोटी रुपयांची भर पडली.
मुंबईत झालेल्या घर विक्रीबाबत नाईट फ्रॅंक कंपनीने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षांतील २६ ॲाक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत नऊ हजार ६५९ घरांची विक्री नोंदली गेली होती. यंदा १५ ॲाक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात १२ हजार ६०२ घर विक्रीची नोंद झाली आहे. प्रत्येक दिवशी सरासरी ४०७ घरे विकली गेल्याचे या आकडेवारीवरून दिसते. गेल्या वर्षाच्या तुलनेत २९४३ घरांची विक्री अधिक झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा >>>मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग: माथेरान येथील बोगद्याचे दीड किमीपर्यंतचे काम पूर्ण
यंदा नवरात्रीत घरविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला, असे नाईट फ्रॅंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले. यंदा नवरात्रीत ४५९४ घरांची विक्री झाली. दिवाळीपर्यंत हा वेग कायम राहिला, असेही बैजल यांनी सांगितले. या प्रतिसादाने विकासकही खूश झाले आहेत. आताही घर खरेदीदारांची गर्दी वाढत असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. छोट्या घरांना सर्वाधिक मागणी आहेच. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी आलिशान घरांनाही यावेळी खरेदीदार सापडले आहेत. कोट्यवधी रुपयांची घरे विकत घेणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मुंबई महानगर प्रदेशातील आलिशान घरांच्या विक्रीत यंदा ७४ टक्के वाढ झाली आहे. मुंबईत अशा प्रकारची ३६ हजार १३० तर पुण्यात ६ हजार ८५० घरांची विक्री झाली आहे. मुंबईत घरविक्रीचा सध्या वाढलेला आकडा हा प्रामुख्याने एक ते दोन कोटींपर्यंतच्या घरासाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.