कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी हत्या होण्याच्या भीतीने पिंपरीहून मुंबईला पळून आलेल्या आणि संरक्षणांची मागणी करणाऱ्या नवपरिणीत दाम्पत्यापैकी मुलीचा जबाब नोंदवून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी पुणे पोलिसांना दिले.
घरच्यांनी विरोध केला म्हणून २१ वर्षांच्या शीख मुलीने पळून जाऊन २२ वर्षांच्या सिंधी मुलाशी प्रेमविवाह केला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तसेच मुलाच्या पालकांना पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले असता तेथे दोघेही सापडल्यास त्यांना तेथेच जीवे ठार करू, असे धमकावले होते. ही बाब कळताच दाम्पत्य मुंबईला पळून आले. तसेच दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेत ‘ऑनर किलिंग’पासून संरक्षण करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. गेल्या बुधवारी त्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुणे पोलिसांना या दाम्पत्याविरुद्ध कुठलाही कारवाई न करण्याचे आदेश देत त्यांना संरक्षण दिले होते. तसेच पुणे पोलिसांना नेमकी परिस्थिती काय आहे हे सांगण्याचे आदेश दिले होते. सोमवारी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वतीने सरकारी वकील के. व्ही. सस्ते यांनी दिली. आपल्या मुलीला पैशांच्या हव्यासापोटी फसविल्याची भीती आपल्याला होती. परंतु तिने जर स्वत:च्या इच्छेने विवाह केला असेल तर आपण आता काहीही करणार नाही, अशी हमी मुलीच्या वडिलांनी जबाबात दिली आहे. तसेच पोलिसांना मुलीचा जबाबही नोंदवायचा असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र पुण्याला दाम्पत्याच्या जिवाला धोका असून तिचा जबाब मुंबईतच नोंदविण्यात यावा, अशी विनंती वकील महेश वासवानी यांनी न्यायालयाकडे केली. त्यांची ही विनंती न्यायालयाने मान्य करीत २१ नोव्हेंबर रोजी एका महिला पोलिसाच्या उपस्थित आझाद मैदान पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा