मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विकासक मोठ्या संख्येने झोपडपट्टीवासियांचे घरभाडे थकवित असून त्याचा मोठा फटका झोपडीधारकांना बसत आहे. पण आता मात्र थकीत घरभाडे वा दरमहिन्याला दिल्या जाणाऱ्या घरभाड्याची वसुली सोपी होणार आहे. घरभाडे आणि थकबाकीचा प्रश्न निकाली लावण्यासाठी अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाने यासाठी तब्बल २५ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधितांना या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून घरभाड्याचा प्रश्न निकाली लावता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोपु प्रकल्पातील रहिवाशांना पुनर्वसन इमारतीतील घराचा ताबा देईपर्यंत घरभाडे द्यावे लागते वा त्याची संक्रमण शिबिरात निवाऱ्याची व्यवस्था करावी लागते. असे असताना अनेक विकासक रहिवाशांचे घरभाडे थकवित असून प्रकल्पही रखडवत असल्याचे निदर्शनास आले आहे. घरभाडे थकविणाऱ्या विकासकांची संख्या आणि थकीत घरभाड्याची रक्कम दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारीमध्ये १५० विकासकांनी ७४१ कोटी ७८ हजार ८६७ रुपये इतके घरभाडे थकविले होते. झोपू प्राधिकरणाने कारवाई केल्यानंतर या विकासकांनी ७४१ कोटी रुपये थकबाकीपैकी १२२ कोटी ४० लाख ५१ हजार ८६७ रुपये घरभाड्याचा भरणा केला. आजही कोट्यवधी रुपयांचे घरभाडे थकीत आहे. थकीत घरभाडे वसूल करण्यासाठी आणि विकासकांनी वेळेत घरभाडे द्यावे यासाठी झोपु प्राधिकरणाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – VIDEO: विहार आणि तानसा ओसंडून वाहू लागले

हेही वाचा – आत्मपरीक्षण करा! अजित पवार यांचा काँग्रेसला टोला

झोपु प्राधिकरणाने महानगरपालिका विभागनिहाय २५ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांची यादी त्यांच्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीसह वर्तमान पत्रात, तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. झोपडीधारक अथवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्याबरोबर मोबाइल वा ई-मेलद्वारे संपर्क साधून आपली थकीत घरभाड्याबाबतची माहिती देता येईल. त्यानंतर अधिकारी संबंधित विकासकाकडून थकीत रकमेची वसुली करून घरभाड्याचा प्रश्न निकाली लावतील. एकूणच प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे आता झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recovery of arrears of house rent under slum rehabilitation scheme is now easy mumbai print news ssb
Show comments