मुंबई : राज्यात सरकारी सेवेतील ७५ हजार जागांच्या भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३१ डिसेंबपर्यंत सरकारी नोकरभरतीच्या सर्व जाहिरातींना ही वाढीव वयोमर्यादा लागू होईल.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून राज्य सरकारने विविध विभागांत ७५ हजार पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार विविध विभागांत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात सरकारी नोकरीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ३३, तर मागास प्रवर्गासाठी ३८ वर्षे अशी कमाल वयोमर्यादा आहे. मात्र, मध्यंतरी करोनामुळे दोन वर्षे राज्यात भरती प्रक्रिया बंद होती.
त्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा पार केली असून, त्यांनी नोकरीची संधी गमावू नये, यासाठी कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २ वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचा कायर्म्भार सांभाळणारे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे पाटील यांनी सांगितले.
लाखो उमेदवारांना दिलासा
महाभरती अंतर्गत शासन सेवेत नियुक्तीसाठी वयोमर्यादा वाढविण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाल्याने लाखो बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.