मुंबई : नियोजन विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबवण्यासाठी १२६६ कनिष्ठ अभियंत्यांना (तांत्रिक सहायक) भरती केले आहे. नियोजन विभागाने रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मनरेगा’च्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत बाह्यसंस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर १८ मे २०२३ च्या परिपत्रकान्वये नियोजन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची सेवा ‘मे. एस.टु.इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड‘ या कंपनीची नेमणूक केली. या कंपनीने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मनरेगाच्या कामासाठी १२६६ ‘तांत्रिक सहायकां’ची भरती केली आहे. या सहायकांचे ऑगस्ट २०२३ च्या  वेतनापोटी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० इतकी रक्कम या कंपनीला देण्यात आली आहे. याची देयके सहायक लेखा अधिकारी यांनी काढली आहेत. या तांत्रिक सहायकांना महिन्यांला ४०,००० रुपये इतके वेतन ठरलेले आहे.

आर्थिक लाभ सहायकांचे वेतन, कंपनींचे शुल्क आदींचा विचार केला तर १२६६ सहायकांच्या मानधनासाठी ३,५०,६३,४२७  रुपये, भविष्य निर्वाह निधीत ५५,४८,२४५ रुपये, व्यवसाय कर तर भरती करणाऱ्या कंपनीला ८३,६९,९२३ रुपये अशी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० रुपये पहिल्या महिन्याचे देयक काढले आहे. यामध्ये कंपनीला ८३ लाखांपेक्षा जास्त आर्थिक लाभ होत आहे. नियोजन विभाग आणि भरती करणाऱ्या कंपनीच्या दरम्यान झालेल्या करारातील तरतुदीनुसार कंपनीस १६ टक्के इतके शुल्क म्हणून देण्यात येत आहे.