मुंबई : गेले चार-पाच वर्षे रखडलेल्या मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांच्या भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. एकूण ६९० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या तोंडावर पालिकेने या भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र ही जाहिरात ११ नोव्हेंबरनंतर संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. गेल्या चार – पाच वर्षांपासून ही पदे भरण्यात आली नव्हती. त्यामुळे अभियंत्यांची भरती करावी या मागणीसाठी अभियंत्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होत नव्हती. पालिका प्रशासनाने १४ ऑक्टोबर रोजी अभियंत्यांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांच्या एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या तोंडावर या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यातच सुरू होणार आहे.
हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेतील लिपिक पदाच्या १८०० जागांसाठी दोन लाख अर्ज
बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी या पदभरतीचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अभियंत्यांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे अभियंत्यांची सुमारे एक हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. परिणामी अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. येत्या दोन – तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होऊन पदे भरली तर हा ताण कमी होईल, अशी अपेक्षा राजाध्यक्ष यांनी व्यक्त केली.